भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याच जयंती सोहळ्याच्या प्रेरणेतून वामनराव गोडबोले यांनी बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल, शांतिवन चिचोली संस्थापक गोडबोले व त्यांचे इतर सहकार्यांनी नागपुरात प्रथमच बुद्ध जयंती साजरी केली. गोडबोले यावेळी म्हणाले होते की, भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञान व महापरिनिर्वाण असा त्रिवार मंगलमय दिवस म्हणजेच वैशाख पौर्णिमा हा होय. ६ मे १९५५ ला वैशाख पौर्णिमेला बुद्धांच्या महापरिनिर्वाणाला २४९९ वर्षे पूर्ण झाली होती. हे औचित्य साधत धम्मसेनापती गोडबोले यांनी वैशाख पौर्णिमेचा तीन दिवसांचा कार्यकम जाहीर केला होता.
भन्ते संघरक्षित यांच्या हस्ते बुद्धदूत सोसायटीची निर्मिती केली होती. याच सोसायटीच्या शाखेअंतर्गत बुद्ध जयंती साजरी व्हावी, यासाठी नामांकित बौद्ध भिक्खू एस. सागर नागपूरला आले होते. त्यावेळी बुद्ध जयंतीच्या कार्यकमाच्या रूपरेषेची माहिती देणारे एक पत्रक प्रकाशित केले होते. ६ मे १९५५ ला भन्ते एस. सागर यांच्या उपस्थितीत बुद्धदूत सोसायटीच्या कार्यालयात त्रिशरण आणि सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली होती. भन्ते सागर यांचे बौद्ध धम्मावरील उपदेशावर प्रवचन झाले. यापूर्वी आनंदनगरातील लक्ष्मण झगूजी कवाडे यांनी भिक्खू एस. सागर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. अशा प्रकारे लक्ष्मण झगूजी कवाडे हे खऱ्या अर्थाने नागपूरचे पहिले धर्मांतरित बौद्ध होते. त्यानंतर बुद्धदूत सोसायटीचे सभासद मनोहर शहाणे यांनीदेखील भन्ते एस. सागर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा प्रदान केली.
७ मे १९५५ ला सायंकाळी ६ वाजता इंदोरा येथील बाळकृष्ण मोहल्ल्यात गोंडाणे भवनात बुद्धदूत सोसायटीच्या इंदोरा शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर कंबोडियातील भन्ते के. के. स्थितप्रज्ञ यांनी बौद्ध धम्मावर प्रवचन दिले होते. ८ मे १९५५ या दिवशी निघालेल्या मिरवणुकीत हत्तीवर तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रतिमा होती. तसेच हत्तीसमोर बॅण्ड, मागे रणगाडे, भजन मंडळी आणि जनसमुदाय उपस्थित होता. सहभागी झालेल्या महिला-पुरुषांच्या हातात पेटत्या मेणबत्त्या होत्या. सारे उपासक साधू-साधू-साधूचा जयघोष करत जात होते.
या मिरवणुकीत 'अनुसरा हो, बुद्धा : धम्म आणि संघ...' ही धून वाजवण्यात आली होती. ही मिरवणूक आनंद टॉकीजमागील कोठारी मेंशन भवनमधील बुद्धदूत सोसायटीच्या कार्यालयातून काढण्यात आली होती. पुढे श्री टॉकीज, आनंद भंडार, सीताबर्डी चौक, गांधी पूल, संत्रा मार्केट, मेयो हॉस्पिटल, इतवारी चौकातून, महाल चौक, शुक्रवार दरवाजा, नवी शुक्रवारी, उंट खाना मार्गाने रात्री ८ वाजता इमामवाड्यात विसर्जित करण्यात आली होती.
-शेखर गोडबोले, नागपूर
संदर्भ :- इ-सकाळ डॉट कॉम
संकलन - द आंबेडकरी चळवळ
0 Comments