Ticker

6/recent/ticker-posts

जेव्हा बाबासाहेबांच आगमन दीक्षाभूमी ला होते.....

 

बाबासाहेब वामनराव गोडबोलेंना म्हणाले, रस्त्यावर अतिशय गर्दी आहे. तेव्हा कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी रस्ता नाही. गोडबोले लगेच म्हणाले, बाबा तुम्ही चिंता करू नका. त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते. श्‍याम हॉटेलमधील सर्व मंडळी तयार झाली. भिक्‍खू चंद्रमणी यांच्यासह आर. डी. भंडारे आणि इतर भिक्‍खूंना घेऊन पहिली कार मिरवणुकीने निघाली. यानंतर माईसाहेब, बाबासाहेब, नानकचंद रत्तू आणि गोडबोले ऍम्बेसॅडर कारमधून निघत असताना त्यांना आधारासाठी काठीचे स्मरण झाले. काठीसाठी गोडबोले सीताबर्डीवर गेले, परंतु तेवढ्या वेळात कर्नलबागेतील प्रल्हाद मेंढे यांनी डझनभर काठ्या आणल्या. त्यातील काळी मूठ असलेली आठ गाठींची काठी बाबासाहेबांनी आधारासाठी ठेवून घेतली. हॉटेल श्‍याम, लोखंडी पूल, टेकडी लाइन, महाराजबाग, उत्तर अंबाझरी मार्ग, शंकरनगर चौक, लक्ष्मीनगरकडून कार गुप्त प्रवेशद्वाराजवळ आली. तट्ट्यांचे प्रवेशद्वार बनवले होते. प्रवेशद्वाराजवळ कार येताच समता सैनिक दलाच्या सैनिकांनी खात्री करून दरवाजा उघडला. क्षणात बाबासाहेब रत्तूंच्या आधाराने स्टेजवर चढले. समोरच्या भीमसागराला उधाण आले होते. उधाणलेल्या समुद्रातून टाळ्यांच्या रूपाने गजर झाला. बाबासाहेबांनी या जनसागराला अभिवादन केले. त्यावेळी गर्दीमधून एकच नारा... बाबासाहेब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार... बाबासाहेब आणि माईसाहेब बुद्धमूर्तीसमोर उभे राहिले. बाबासाहेब आणि माईच्या हाती कमळाचे पुष्पहार होते. भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी त्रिशरण पंचशील दिले. बुद्ध, धम्म आणि संघ शरणम्‌ गच्छामि वदवून घेतले. दीक्षा मंचावर यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माईसाहेब, यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, भन्ते चंद्रमणी महास्थवीर, भन्ते सदित्सतस्स (श्रीलंका), भन्ते संघरत्न (श्रीलंका), भन्ते प पञ्ञातिस्स (सांची), भन्ते प्रज्ञानंद (लखनऊ) यांच्यासह, नानकचंद रत्तू, वामनराव गोडबोले, रेवाराम कवाडे उपस्थित होते. अशाप्रकारे माता कचेरी परिसरातील ही मोकळी जागा म्हणजे आजची दीक्षाभूमी. लाखो बौद्धांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणाऱ्या दीक्षाभूमीवरील इतिहासाची नोंद गोडबोलेंच्या लेखणीतून पुस्तकरूपात नोंदविली आहे.

- आंबेडकरी चळवळ टीम 

Post a Comment

0 Comments